पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्था गाव पातळीवर कार्यरत होत्या. तर ग्रामीण पुनर्बांधणी संस्थांच्या कार्याचा तालुका पातळीवर समन्वय साधण्यासाठी तालुका विकास संस्थांची स्थापना करण्यात आली.

 १९३८-३९ मध्ये ग्रामीण पुनर्बांधणी संस्थांची संख्या १२ पर्यंत पोहोचली. यावर्षी वाघोडिया, खेडूत आणि कालो तालुका विकास संघटनांनी तालुका स्तरावर मूलभूत गरजांच्या पूर्तता करण्याबरोबरच विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा केला.

 ग्रामीण भागाच्या पुनर्बांधणीसाठी भारत आजही धडपडत आहे. भारत सरकारकडून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि योजना वर्षानुवर्षे राबवल्या जातात. परंतु सयाजीरावांनी १९३३ मध्ये ग्रामीण पुनर्बांधणीसाठी सहकारी तत्त्वावरील ग्रामीण पुनर्बांधणी संस्थांचा केलेला प्रयोग या दृष्टीने आजही पथदर्शी ठरतो.

११) स्त्रिया व पुरुषांच्या काटकसर (बचत गट) संस्था

 काटकसर हे आर्थिक बदलाचे सूत्र मानून १९३१ साली महिलांच्या काटकसर संस्थांची निर्मिती सयाजीरावांनी केली. १९३१ मध्ये संपूर्ण बडोदा राज्यात ११ महिला काटकसर संस्था कार्यरत होत्या. यातील महिला सभासदांची संख्या २०५ व त्यांनी केलेली काटकसर ३,०६४ रुपये होती. जास्तीत जास्त महिलांना यामध्ये सहभागी करून घेण्याचा उद्देश काटकसर संस्था स्थापनेमागे होता. बांग्लादेशातील अर्थशास्त्रज्ञ आणि बचत गट

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २८