पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहकार चळवळीमध्ये काम करण्याची इच्छा असलेले नागरिक याकडे आकर्षित झाले.

 १९२३-२४ मध्ये बडोदा व नवसारी जिल्ह्यातील संस्थांच्या सचिवांसाठी आणि सहकारी संस्थांच्या कामात प्रत्यक्ष रस घेणाऱ्यांना बडोद्यातील 'सचिव सहकारी प्रशिक्षणवर्गात' सरकारने सहकारविषयक प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. २५ लोकांनी या प्रशिक्षणवर्गात उपस्थिती दर्शवली. या वर्गाच्या शेवटी परीक्षा घेऊन उत्तीर्ण परीक्षार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली.

 १९२७-२८ व्या वर्षात सहकार खात्याने शेतकऱ्यांना शेती संदर्भातील विविध विषयावरची वेळेत माहिती देण्यासाठी 'कृषी दिनदर्शिके' चे प्रकाशन केले. कृषी दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा हा ब्रिटिश भारतातील पहिलाच प्रयोग असावा. बडोदा राज्यातील सहकार चळवळीमध्ये प्रत्येक वर्षागणिक चांगल्या प्रकारे वाढ होत होती. सहकारासंदर्भातील नवनवीन संस्थांची भर पडत गेली. त्यामुळे सहकार चळवळ जनसामान्यात खोलवर रुजली.

मध्यवर्ती सहकारी प्रशिक्षण संस्था

 बडोदा संस्थानात मध्यवर्ती सहकारी प्रशिक्षण संस्थेची स्थापना १९२३ मध्ये करण्यात आली. संस्थानात सहकार चळवळीचा प्रचार-प्रसार करणे, सहकारासंदर्भातील विषयांच्या अभ्यासाला उत्तेजन देणे, सहकार परिषदा व प्रशिक्षणवर्गांचे

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३३