पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यात समावेश होता. हैदराबाद संस्थानात १९३१ मध्ये एकूण २८ केंद्रीय बँका कार्यरत होत्या. या २८ केंद्रीय बँकांपैकी १० केंद्रीय बँकांना शासनाकडून २,०६,८९८ रु. आर्थिक साहाय्य करण्यात आले, तर कृषी आणि बिगर कृषी संस्थांना अनुक्रमे ४६,१६७ रु. व ८२,१५० रु. शासनाकडून पुरवण्यात आले.

 १९३१ मध्ये बडोदा संस्थानातील सहकारी संस्थांचे एकूण खेळते भांडवल ६८,३२,२२६ रु. होते. बडोदा शासनाकडून सहकारी संस्थांना ७,३८,२०८ रु. चे आर्थिक साहाय्य कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात आले. बडोदा सरकारकडून देण्यात आलेले आर्थिक साहाय्य सहकारी संस्थांच्या एकूण खेळत्या भांडवलाच्या ९.२६% होते. शासनाच्या आर्थिक साहाय्याचे बडोद्यातील प्रमाण इतर संस्थानांच्या तुलनेत सर्वाधिक होते. संस्थानच्या आर्थिक विकासातील सहकार चळवळीचे महत्त्व ओळखून बडोदा सरकारने सहकारी संस्थांच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेतला. सहकार संस्थांच्या उभारणीसाठी केवळ सर्वसामान्य जनतेवर अथवा संस्था सभासदांवर अवलंबून न राहता शासनाने घेतलेला पुढाकार इतर संस्थानांच्या तुलनेत बडोद्यातील सहकार चळवळीचे वेगळेपण आणि सयाजीरावांची आपल्या प्रजेच्या कल्याणाची तळमळ यावर शिक्कामोर्तब करतो.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४०