पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील सहकारी संस्थांच्या कर्जाचे व्याजदर

 ब्रिटिश भारतातील विविध संस्थानात स्थापन झालेल्या सहकारी संस्थांचा प्रमुख उद्देश संस्था सभासदांना पतपुरवठा हा होता. सभासदांना कर्जरूपाने पतपुरवठा करणाऱ्या या विविध प्रकारच्या सहकारी संस्था आर्थिक साहाय्यासाठी त्या-त्या संस्थानातील केंद्रीय बँकांवर अवलंबून होत्या. जम्मू- काश्मीरमध्ये केंद्रीय बँकेकडून ९% व्याजदराने सहकारी संस्थांना कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. तर सहकारी संस्थांकडून संस्था सभासदांना पुरवण्यात येणाऱ्या कर्जाचा व्याजदर १२.५% इतका होता. म्हैसूर संस्थानात सहकारी संस्थांना ३ ते ७% व्याजदराने केंद्रीय बँकांकडून कर्जपुरवठा केला जात होता. तर सहकारी संस्था सभासदांना दिलेल्या कर्जावर ९ ते १२% व्याज आकारत होत्या.

 बडोद्यातील केंद्रीय बँका मर्यादित उत्तरदायित्व बिगर कृषी पतपुरवठा संस्थांना ४.५ ते ६% व्याजाने अर्थसाहाय्य पुरवत होत्या. तर या सहकारी संस्था केवळ १.५ % अधिक व्याजदर आकारून सभासदांना कर्ज देत होत्या. अमर्यादित उत्तरदायित्व बिगर कृषी पतपुरवठा संस्थांसुद्धा केंद्रीय बँकेपेक्षा केवळ १.२५ % अधिक व्याजदराने सभासदांना अर्थसाहाय्य पुरवत होत्या. ब्रिटिश भारतातील इतर संस्थानांच्या तुलनेत बडोद्यात सहकारी संस्थांकडून आकारला जाणारा व्याजदर कमी होता.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४१