पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकाशित केली. याबरोबरच सातत्याने सहकार प्रसारासाठीची पत्रके वेळोवेळी मोफत वाटली जात. संस्थानातील सर्वसामान्य जनतेमध्ये सहकारविषयक जागृतीसाठी बडोदा शासनाकडून करण्यात आलेले गुणात्मक प्रयत्न ही इतर संस्थानांच्या तुलनेत बडोद्याचे ठळक वैशिष्ट्य ठरते.

 वरील तुलनात्मक आढाव्यातून एक बाब स्पष्ट होते की बडोदा प्रत्येक आघाडीवर उर्वरित भारताच्या पुढे होता. बडोद्यात लोकसंख्येच्या तुलनेत प्राथमिक सहकारी संस्थांची संख्या उर्वरित भारताच्या तुलनेत सर्वाधिक होती. सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश सभासदांना कर्जपुरवठा करणे हा असतो. यामध्ये उर्वरित भारताच्या तुलनेत प्रतिसभासद सर्वाधिक कर्जपुरवठा बडोद्यात केला जात होता. प्रत्येक सभासदामागील खेळत्या भांडवलाचे प्रमाण मुंबई प्रांतानंतर बडोद्याचे सर्वाधिक होते. सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीतील शासनाच्या सहभागाचा विचार करता बडोदा संस्थानचा सहभाग उर्वरित भारताच्या तुलनेत सर्वाधिक होता. सहकारी संस्थांकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा विचार करता संपूर्ण भारतात सर्वात कमी व्याजदराने सभासदांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानही बडोद्याला जातो. सहकार चळवळीबाबतची प्रकाशने आणि प्रशिक्षणाचा विचार करता बडोदा संस्था याबाबतही अग्रेसर होते. सहकार प्रकाशने व प्रशिक्षणाचे काम संस्थानच्या प्रशासनाकडून होत होते. इतर ठिकाणी ते बिगर शासकीय यंत्रणेकडून होत होते.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४३