पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९२०-२१ मध्ये कोल्हापूर संस्थानात ३७ सहकारी संस्था होत्या तर त्याचवर्षी बडोद्यातील सहकारी संस्थांची संख्या ५०९ इतकी होती. म्हणजेच कोल्हापूर संस्थानच्या १४ पट सहकारी संस्था बडोद्यात होत्या. १९२७-२८ मध्ये सहकार खात्याकडून ‘शेती आणि सहकार” नावाचे दुसरे त्रैमासिक सुरू केले. सहकार प्रशिक्षणाबरोबर सहकार परिषदा हा बडोदा संस्थानचा सहकार साक्षरतेचा नियमित उपक्रम होता. शेतकऱ्यांना शेती संदर्भातील विविध विषयांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सहकार खात्याने 'कृषी दिनदर्शिका' प्रकाशित केली.

 भांडवल उपलब्धीबाबत बडोदा भारतात प्रथम क्रमांकावर होते. दर १,००० लोकसंख्येमागे बडोद्यात ४३. ३ सहकारी संस्था होत्या. हे प्रमाण ब्रिटिश भारत आणि इतर संस्थानांच्या जवळजवळ दुप्पट होते. सभासदांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बडोदा तत्कालीन भारतात प्रथम क्रमांकावर होते. बडोद्यातील कृषी सहकारी संस्थांचे कर्ज वाटप सरासरी १०८ रु. प्रतिसभासद इतके होते. हे तत्कालीन भारतातील सर्वाधिक आहे. मुस्लिम, अंत्योज, चर्मकार, ब्राह्मण, भंगी अशा जाती- धर्माच्या सहकारी संस्थांचे जाळे सर्वदूर पसरणारे सयाजीराव भारतात पहिले ठरतात. सर्व जातीधर्म, आदिवासी पासून ते सर्व व्यवसायांना त्यांनी सहकार चळवळीच्या कक्षेत आणले.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४९