पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हाईटनॅक हे पहिले अमेरिकन तज्ज्ञ सल्लागार होते. या काळात जुन्या पतपेढ्या बंद झाल्यामुळे स्थानिक उद्योगांना भांडवलाची कमतरता जाणवत होती. बडोदा सरकार राज्याचे सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बरेचसे भांडवल बँक ऑफ मुंबईमध्ये गुंतवत होते. ही बँक बडोदा संस्थानच्या अधिकार क्षेत्राबाहेर होती. या पार्श्वभूमीवर सरकारची सर्व गुंतवणूक बँक ऑफ मुंबईमध्ये गुंतवल्यामुळे होणारा तोटा टाळण्यासाठी बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्याची सूचना व्हाईटनॅक यांनी केली.

 बडोद्यातील औद्योगिक व शेती क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक भांडवली पाठबळ पुरवण्याच्या उद्देशाने व्हाईटनॅक यांच्या मार्गदर्शनाखाली ९ जुलै १९०८ रोजी बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्यात आली. बडोदा बँकेच्या स्थापनेमागची स्वतःची भूमिका आणि बँकेकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्ट करताना बँकेच्या उद्घाटन समारंभात सयाजीराव म्हणतात, “स्वतः सहकारी तत्त्वावर चालून नवीन संस्थांनाही त्याच तत्त्वाचा वस्तुपाठ या बँकेने दिला पाहिजे आणि व्यापारविषयक व्यवहाराच्या आधुनिक पद्धती लोकांना शिकविण्याचे कामही या बँकेने सतत केले पाहिजे. मुंबईमध्ये स्वदेशी भांडवलावर नुकत्याच स्थापना झालेल्या दोन बँकांनी जे संपूर्ण यश संपादन केले आहे. त्यावरून निर्विवाद सिद्ध झाले आहे की, कोणत्याही देशातील हुशार बुद्धिवंताशी हिंदी अर्थशास्त्रज्ञ

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ८