पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टक्कर देऊ शकतात. हिंदी लोकांतील काही जाती तर फार जुन्या काळापासून विविध सराफी व्यवहारांना एक उच्च कला म्हणून ओळखत आहेत.”

 बडोद्यातील सहकार विकासाचा भांडवली पाया घालण्यात 'बँक ऑफ बडोदा'ने मूलभूत भूमिका बजावली. बडोदा बँकेची स्थापना करताना दहा लाख रुपयांपैकी निम्मे पाच लाख रुपये भांडवल संस्था सभासदांच्या ठेवीतून उभा केले गेले, तर उर्वरित भांडवल सयाजीरावांनी संस्थानाकडून ठेवीच्या स्वरुपात बँकेला उपलब्ध करून दिले. संस्थानच्या या ठेवीमुळे बँकेची कर्जपुरवठ्याची क्षमता वाढली. परिणामी उद्योग उभा करण्यासाठी लागणारे भांडवल बडोदा बँकेकडून सहजपणे सवलतीत उपलब्ध होऊ लागले. बडोदा बँकेने आपले कार्यक्षेत्र संस्थानाबाहेर विस्तारले. बडोदा बँकेच्या एकूण पंधरा शाखांपैकी बॉम्बे, सुरत, अहमदाबाद आणि भावनगर या चार शाखा बडोद्याबाहेर होत्या.

 बडोदा बँकेच्या सचोटीपूर्ण कारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती सातत्याने सुधारत गेली. १९२९ मध्ये बडोदा बँकेचे भा भांडवल ३० लाख रु. पर्यंत पोहोचले तर बँकेचा राखीव निधी २३ लाख ५० हजार रु. होता. या मजबूत आर्थिक स्थितीच्या आधारे बडोदा बँकेकडून बडोद्यातील केंद्रीय सहकारी बँकेलादेखील आर्थिक मदत पुरविली जात होती. केंद्रीय सहकारी बँका बडोद्यातील विविध सहकारी संस्थांना अर्थसाहाय्य करत होत्या.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ९