पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलेंच्या स्त्री उद्धाराच्या धोरणाचा विकास
 फुलेंनी सावित्रीबाईंच्या सोबतीने शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या उत्कर्षाचा मार्ग तयार केला. स्त्रियांना शिक्षण देण्याबरोबरच केशवपन, बालविवाह, विधवाविवाह, सती जाणे यासारख्या अनिष्ट चालीरीतींमधून त्यांना मुक्त करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. महिलांना अंधश्रद्धा व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 'महिला सेवा मंडळा'ची स्थापना केली.सयाजीरावांनी फुले व सावित्रीबाईंनी आखलेल्या स्त्री उद्धाराच्या कार्यक्रमाचा विकास करत स्त्री सक्षमीकरणाचे परिपूर्ण 'मॉडेल' बडोद्यात उभारले.

 सयाजीरावांनी बडोदा संस्थानात स्त्रियांसाठी अनेक संस्था उभारून त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना दिली. फिमेल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना, अस्पृश्य मुलींसाठी स्वतंत्र शाळेची स्थापना, आदिवासी मुलींसाठी भारतातील पहिली मोफत निवासी शाळा, भारतातील पहिले महिलांसाठीचे ग्रंथालय, भारतातील पहिला महिलांसाठीचा क्लब, स्त्रियांसाठीची भारतातील पहिली व्यायामशाळा, भारतातील पहिल्या बाल सप्ताहाचे आयोजन अशा अनेक योजना भारतात पहिल्यांदा राबविण्याचे श्रेय सयाजीरावांना जाते. याबरोबरच महाराजांनी स्त्रियांसाठी विविध कायदे करून त्यांना समाजात असणारा दुय्यम दर्जा उंचावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा (१९०१), हिंदू कोड बिल (१९०५), हिंदू विवाह कायदा

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / १५