पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ला 'बडोदा वत्सल' प्रेसने सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह प्रकाशित केला. फुले दाम्पत्याच्या वैचारिक आयुष्यात 'बडोद्या' ने पुरवलेल्या खंबीर आधाराचा हा इतिहास आजवर 'अंधारात ' राहिला.
सावित्रीबाई आणि महाराणी चिमणाबाई

 सयाजीरावांच्या प्रेरणेने महाराणी चिमणाबाईंनी १९११ मध्ये भारतीय स्त्रियांच्या स्थितीची जगातील ७ खंडातील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करणारा ‘The Position of Women in Indian Life' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ भारतीय स्त्रियांना अर्पण केला असून तो लंडनमधून प्रकाशित झाला होता. या ग्रंथाचे लेखन चिमणाबाईंनी एस. एम. मित्रा या विद्वानाच्या सहकार्याने केले होते. स्त्रियांना आत्मसन्मानासह सक्रिय सामाजिक सहभागासाठी काय करायला हवे याचा जागतिक परिप्रेक्ष्यात विचार करणारा जगातील हा एकमेव ग्रंथ आहे. तर जगातील स्त्रियांच्या स्थितीशी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना करून लिहिलेला हा आजखेरचा एकमेव ग्रंथ आहे. लंडनमधील फरगॉटन बुक्स ने या पुस्तकाची १९१२ ला दुसरी आवृत्ती काढली आहे. फरगॉटन बुक्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते जगातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ ग्रंथांचे कोणताही बदल न करता पुनर्मुद्रण करते. चिमणाबाईच्या या पुस्तकाला फरगॉटन बुक्सने classical reprint series मध्ये निवडले आहे. यावरून या पुस्तकाचा ऐतिहासिक दर्जा लक्षात येतो.

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / १९