पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वप्न त्यांच्या अपेक्षेहून अधिक प्रमाणात सत्यात उतरवणाऱ्या सयाजीरावांचे फुले दाम्पत्याच्या कार्याला दिलेले भक्कम पाठबळ आजवर दुर्लक्षित राहिले.
फुले आणि सयाजीराव : शूद्रातीशूद्रांचे मुक्तिदाते

 बहुजनांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य ' वेचलेल्या ' महात्मा फुलेंनी १९ ऑक्टोबर १८८२ रोजी हंटर कमिशनसमोर बहुजनांच्या शिक्षणासंदर्भात केलेली मागणी अशा प्रकारची भारतातील पहिली आणि म्हणूनच क्रांतिकारक मागणी मानली जाते. या निवेदनात फुलेंनी शूद्रातिशूद्रांच्या मोफत शिक्षणाचा आग्रह धरतानाच शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी शिष्यवृत्ती आणि बक्षिसे यासारखे प्रयत्न करावेत, शिक्षण सक्तीचे करावे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा उघडाव्यात यासारख्या मागण्या केल्या होत्या. सयाजीराव १८७५ ला बडोदा गादीला दत्तक गेले. १८८१ मध्ये त्यांना राज्याधिकार प्राप्त झाले आणि १८८२ ला बडोद्यातील सोनगड तालुक्यातील आदिवासी आणि अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षणाचा पहिला क्रांतिकारक हुकूम त्यांनी काढला. या हुकुमानुसार सरकारी खर्चाने शिक्षण व राहण्या-खाण्याची मोफत सोय असणारे वसतिगृह सुरू झाले. पुढे १८९३ मध्ये अमरेली जिल्ह्यातील १० गावांमध्ये हा कायदा लागू केला. १९०६ मध्ये संपूर्ण बडोदा राज्यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची सोय केली.

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / ९