पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधश्रद्धा निर्मूलक सयाजीराव

 प्रत्येक सुधारणेची सुरुवात सयाजीराव ज्याप्रमाणे स्वत: पासून करत होते त्याचप्रमाणे धार्मिक सुधारणांची सुरुवातही त्यांनी राजवाड्यातील देवघरापासून केली. राजघराण्यातील धर्मभोळ्या व्यक्तींचा फायदा घेत काही बाबी साध्य करण्यासाठी ब्राह्मणांकडून राजघराण्यातील व्यक्तींना विविध प्रकारचे धार्मिक विधी करण्याचा आग्रह केला जात असे. बऱ्याचदा हे धार्मिक विधी अर्थहीन असत. मि. पेस्तनजी यांच्या सांगण्यावरून विनायकराव बहुलकर हे पुण्यातील विविध मंदिरांमध्ये बडोदा राजघराण्यातील व्यक्तींच्या नावाने धार्मिक विधी करत असत. बडोदा राजघराण्यात अशा विविध कर्मकांडांचे स्तोम माजले होते.

 विविध ग्रहांच्या स्थितीचा राजघराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यावर पडणारा वाईट परिणाम दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या ग्रहांच्या शांतीचा विधीदेखील मोठ्या प्रमाणावर केला जात असे. याचबरोबर राजघराण्यातील व्यक्तींची दृष्ट काढण्याची पद्धत अशाच कर्मकांडाचा एक भाग होती. राजघराण्यातील व्यक्तींचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क आल्यानंतर किंवा एखाद्या विशेष प्रसंगानंतर दृष्ट लागून त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्या व्यक्तीची दृष्ट काढली जात असे; परंतु अशी दृष्ट कोणत्या प्रसंगी, किती वेळा, कोणत्या व्यक्तीने काढावी या संदर्भात कोणतेही नियम निश्चित केलेले नव्हते. त्यामुळे

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ११