पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यातील ब्राह्मण व्यक्तींकडून याचा गैरफायदा घेतला जाई. दक्षिणेच्या हव्यासापायी या ब्राह्मणांकडून राजघराण्यातील व्यक्तींची विनाकारण दृष्ट काढण्याचे प्रसंग वारंवार घडवून आणले जात असत. मुंग्याना साखर घालणे हादेखील अशाच प्रकारचा एक विधी होता.

 सुरुवातीच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींचा या विधींना असणारा पाठिंबा आणि प्रशासनातील अनागोंदी कारभार यामुळे सयाजीरावांना हे सर्व प्रकार शांतपणे सहन करावे लागत होते. या विधींसाठी लागणारा खर्च अगोदर मंजूर करून न घेता ऐनवेळी महाराजांकडून या खर्चास मान्यता मिळवण्याची सवय प्रशासनास लागली होती. अशावेळी हे विधी थांबवून महाराज कोणतीही चौकशी करू शकत नसल्याने या खर्चाला मान्यता देणे त्यांना भाग पडत असे. या परिस्थितीचा फायदा स्वार्थी पुजाऱ्यांकडून घेतला जात असे; परंतु एकदम अधिकाराच्या जोरावर कोणताही बदल न करता हळूहळू लोकांचे मतपरिवर्तन करण्यावर सयाजीरावांनी भर दिला.

 सयाजीरावांनी राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजावेत यासाठी या विधींचे मंत्र अर्थासह प्रकाशित करण्याचा विचार केला. महाराजांनी त्यादृष्टीने २३ नोव्हेंबर १८८६ ला हु.हु.नं. ५० नुसार राजवाड्यात होणारी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर रा. रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १२