पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोबदला म्हणून श्रावण महिन्यात त्यांना दक्षिणा देण्याची प्रथा सुरू झाली. पुढे हीच परंपरा बडोद्यात रुजली. याबरोबरच १८०२ मध्ये बडोद्यात विद्वान ब्राह्मणांना विशेष दक्षिणा देण्याची पद्धत सुरू झाली. तर १८०८ पासून संस्थानाबाहेरील ब्राह्मणांनादेखील दक्षिणा देण्यात येऊ लागली. मल्हारराव महाराजांच्या काळात श्रावणमास दक्षिणेवर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली. हीच स्थिती सयाजीरावांच्या सुरुवातीच्या काळात कायम होती. १८७७-७८ मध्ये श्रावणमास दक्षिणेवर १ लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली.

 तत्कालीन दिवाण सर टी. माधवराव यांना श्रावणमास दक्षिणेवर केला जाणारा हा अवाढव्य खर्च चिंतेची बाब वाटत होती. ७ जुलै १८८१ रोजी त्यांनी सयाजीरावांना 'राजवाडा विभाग' या विषयावर दिलेल्या व्याख्यानात ही चिंता व्यक्त केली आहे. या व्याख्यानात ते म्हणतात, “श्रावण दक्षिणा, बिदागी रमणा व इतर बाबींवर होणाऱ्या खर्चावरील नियंत्रण सुटले आहे. महाराजांनी या विषयात लक्ष घालून दानधर्मावर होणारा अवास्तव खर्च शिक्षणास प्रोत्साहन व दारिद्र्य निर्मूलनासारख्या योग्य कारणासाठीच होईल याची काळजी घ्यावी.” या सुचनेबरहुकूम सयाजीरावांनी राज्याधिकार प्राप्तीनंतर हा अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरुवात केली.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १९