पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावांनी या खर्चाचा आढावा घेण्यासाठी १८९२ मध्ये एक समिती नेमली. या समितीमध्ये इंग्रजी शिकलेल्या पदवीधरांबरोबरच पारंपरिक शास्त्री पंडितांचाही समावेश करण्यात आला होता. या समितीच्या शिफारशीवरून दरवर्षी श्रावण महिन्यात विविध विषयांवर आधारित परीक्षा घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच दक्षिणा देण्याचा नियम सयाजीरावांनी १८९४-९५ मध्ये केला. सुरुवातीच्या काळात एकदा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला ५ वर्षे दक्षिणा देण्यात येत होती. नंतरच्या काळात हा कालावधी कमी करून ३ वर्षे करण्यात आला. शेवटी दरवर्षी परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तीलाच दक्षिणा देण्याचा सयाजीरावांनी आदेश दिला. या दक्षिणेची रक्कम ३० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत होती. या परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी आपले ज्ञान अद्ययावत करण्याची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकण्यात आली. १८७७- ७८ मध्ये श्रावणमास दक्षिणेवर झालेला १ लाख रुपयांहून अधिकचा खर्च या नियमाच्या अंमलबजावणीनंतर ५ हजार रुपयांवर आला. या श्रावणमास दक्षिणेतील बचतीपैकी प्रतिवर्षी ५,५०० रु. ची तरतूद नवीन ग्रंथांच्या लेखनासाठी करण्यात आली. पुढे सयाजीरावांनी या बचतीपैकी प्रतिवर्षी १०,००० रु. धर्मशास्त्रावरील उत्तम पुस्तके मराठीतून प्रसिद्ध करण्यासाठी खर्च करण्याचा आदेश दिला.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २०