पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८८१-८२ मध्ये धर्मादाय खर्चात मागील वर्षीपेक्षा ७८,१२१ रु. बचत झाली. १८८७-८८ मध्ये धर्मादाय खर्चात झालेली १,०५,९८९ रु. ची वाढ ही या २० वर्षांच्या कालखंडातील सर्वांत मोठी वाढ होती; परंतु ३ वर्षांच्या आतच १८९०-९१ मध्ये दानधर्मावरील खर्चात १,०८,०७९ रु. ची कपातदेखील करण्यात आली. तर १८९९-१९०० अखेर या खर्चात तिप्पट घट झाली. कोणताही बदल करत असताना हुकुमाच्या आधारे बदलाची अपेक्षा न करता सातत्यपूर्ण प्रयत्नातून अपेक्षित बदल साध्य करण्याची सयाजीरावांची हातोटी या प्रक्रियेत स्पष्ट होते.

वेदोक्त: धार्मिक सुधारणेचा कार्यक्रम

 आधुनिक काळातील गाजलेली दोन वेदोक्त प्रकरणे म्हणजे बडोदा आणि कोल्हापूर होय. बडोद्यातील वेदोक्त हे कोल्हापूरच्या अगोदर ४ वर्षे म्हणजेच १८९६ मध्ये घडले. महाराजांनी १८८४ पासूनच धर्म सुधारणेचा कार्यक्रम सुरू केला होता. १८९२ पासून १८९६ पर्यंत सयाजीरावांनी यासंदर्भातील आपला अभ्यास पक्का केला असल्याने बडोद्यातील हे वेदोक्त प्रकरण कोल्हापूरच्या वेदोक्ताइतके चिघळले नाही.

 पहिल्या महाराणी चिमणाबाई यांच्या भगिनी नेपाळमध्ये दिल्या होत्या. नेपाळमधील मंडळी आणि महाराज यांच्या एकत्र भोजनाच्या एका प्रसंगी त्या मंडळींनी महाराजांना आपल्या पंगतीस घेण्यास नकार दिला. ही घटना वेदोक्ताचा विचार महाराजांच्या मनात येण्यामध्ये कारणीभूत ठरलेली पहिली घटना होती. त्यानंतर २१ ऑगस्ट १८९१ ला महाराज जोधपूरला

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २१