पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांनी वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने सरदेसाईंचा कसा उपयोग करून घेतला ही हकीकत मनोरंजक आहे. सरदेसाई म्हणतात, “महाराजांनी आपल्या धर्मकृत्यांत क्षत्रियांचे विधी वेदोक्त मंत्रांनी करण्याचा परिपाठ घातला; पूर्वीच्या उपाध्ये मंडळींना नोकरीतून कमी करून वेदमंत्रांनी कर्मे करणारे नवीन उपाध्ये नेमिले. ह्या कामी महाराजांचे हुकूम बरोबर पाळले जातात की नाही, पूजा, श्रावणी इत्यादी प्रसंगांत जे मंत्र म्हटले जातात ते वेदांतले की बाहेरचे हे तपासण्याचे काम त्यांनी मला सांगितले. त्यासाठी सर्व सोळा संस्कारांच्या विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम मी केले.”

 मे १८९६ ला महाराजांनी १५ ऑक्टोबर १८९६ पासून वेदोक्त विधी करण्याचा आदेश दिला असला तरी हा विधी करण्यासाठी एकही महाराष्ट्रीयन ब्राह्मण तयार झाला नाही. त्यामुळे वाड्यातील संबंधित सर्व ब्राह्मणांना नोकरीतून काढून, त्यांचे उत्पन्नही जप्त करण्यात आले. महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी नकार दिल्याने १५ ऑक्टोबरचा राजवाड्यावरील दसऱ्याचा विधी शिवदत्त मारवाडी जोशी, रेवाशंकर व भोलानाथ या तीन गुजराती ब्राह्मणांनी सुरू केला. राजवाड्यातील ब्राह्मण भोजनास महाराष्ट्रीयन ब्राह्मणच असत; परंतु वेदोक्ताचा परिणाम म्हणून या ब्राह्मणांनी राजवाड्यावरील भोजनावर बहिष्कार टाकला. सयाजीरावांनी याला पर्याय म्हणून महाराष्ट्रीयन ब्राह्मणांऐवजी या भोजनात गुजराती ब्राह्मण किंवा इतर जातीचे किंवा कोणत्याही

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २३