पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ये सत्यशोधकी विचारांचे रामचंद्र विठोबा धामणस्कर यांना ब्रिटिश सरकारच्या नोकरीतून बोलावून घेऊन सयाजीरावांनी बडोद्यात नायब सुभे या पदावर नेमले. तेव्हापासूनच बडोद्यात सत्यशोधकी विचारांना चालना मिळाली. धामणस्करांचा जातीविषयक प्रश्नांचा उत्तम अभ्यास होता. पुढे १९०१ मध्ये धामणस्कर बडोद्याचे दिवाण बनले. रामजी संतूजी आवटे या आणखी एका सत्यशोधकी विचारांच्या व्यक्तीने 'बडोदा वत्सल' हे सत्यशोधकी वर्तमानपत्र काढून बडोद्यातील सामाजिक प्रश्नांची चर्चा चालू ठेवली.

 ब्राह्मणेतरांना त्यांच्या धार्मिक कार्याची जाणीव होण्यासाठी रामजी संतूजी आवटे आणि धामणस्कर यांनी मिळून १८९६ मध्ये बडोद्यात माधवराव पवार यांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरू केला. या पुरोहित पाठशाळांच्या माध्यमातून धर्मप्रचारक नेमून धर्मातील मुलत्वाचा प्रसार करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविण्यात आले. या पाठशाळेत धार्मिक साक्षरतेचे शिक्षण दिले जात होते. त्याचबरोबर भगवद्गीतेचे ज्ञानदेखील देण्यात येत होते. पुढे २३ वर्षांनी याच धर्तीवर १९१९ मध्ये कोल्हापूर येथे श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना सत्यशोधक भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली केली.

 ज्या काळात अस्पृश्यांना शिक्षण घेण्यास मनाई होती त्या काळात ब्राह्मणेतर जातींना विशेषतः अस्पृश्य जातींना संस्कृत शिक्षण देण्याची दृष्टी महाराजांनी दाखवली. हा फारच

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २५