पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हस्तलिखिते जमा केली. या कामाला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी सयाजीरावांनी १९२७ ला बडोद्यात प्राच्यविद्या संस्थेची स्थापना केली. १९३३ पर्यंत १३,९८४ प्राचीन दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो.

 प्राच्यविद्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी १९१५ मध्ये 'गायकवाड ओरिएंटल सिरीज' ही संशोधन प्रकाशन माला सुरू केली. १९१६ मध्ये राजशेखरकृत 'काव्यमीमांसा' हा या मालिकेतील पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. पाश्चात्त्य संशोधन पद्धती आणि प्रकाशन संहितेनुसार हस्तलिखितांच्या संशोधित आवृत्त्या 'गायकवाड ओरिएंटल सिरीज' प्रकाशित करू लागली. बडोदा प्राच्यविद्या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या या गायकवाड ओरिएंटल सिरीजचा आंतरराष्ट्रीय दबदबा एवढा होता की, महाराज एकदा लंडनच्या इंडिया ऑफिस ग्रंथालयात गेले असता या सिरीजचे प्रणेते म्हणून त्यांना प्रथम प्रवेश देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ही घटना म्हणजे ' गायकवाड ओरिएंटल सिरीज'ला मिळालेल्या जागतिक मान्यतेचा पुरावाच आहे. दुर्दैवाने जागतिक मान्यता पावलेल्या या सिरीजचे नावदेखील आजच्या संशोधकांना माहीत नाही, ही आपली सर्वांत मोठी शोकांतिका आहे.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३२