पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९१७ मध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे संकल्पक डॉ. श्रीपाद बेलवलकर या संस्थेच्या स्थापनेसंदर्भात १९१६ मध्ये बडोद्यात सयाजीरावांना भेटले होते; परंतु अशा प्रकारची संस्था बडोद्यात स्थापन करण्याची योजना महाराजांनी त्याआधीच आखली होती. तरीदेखील सयाजीरावांनी बेलवलकर यांना पूर्णपणे निराश न करता भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेसाठी १००० रु. ची आर्थिक मदत देऊ केली. १९१६ पासून पुढे १९४० पर्यंत एकूण २४ वर्षे वर्षाला पाचशे रुपये वर्षासन असे एकूण १२,००० रु. चे आर्थिक साहाय्य महाराजांकडून करण्यात आले. १९२२ मध्ये या संस्थेला महाराजांनी महाभारतावरील संशोधनासाठी ५,५०० रुपये दिले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १८,५०० रुपये आर्थिक साहाय्य केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४ कोटी ५८ लाख ६२ हजार रुपये इतकी होते; परंतु संस्थेच्या उभारणीत पायाभूत योगदान असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत संस्थेचे आश्रयदाते म्हणून सयाजीरावांचा फोटोसुद्धा येथे आपल्याला आढळत नाही याचे नवल वाटते.

बडोद्यातील पुरातत्त्व विभाग

 बडोदा संस्थानातील महत्त्वाच्या स्मारकांचे संवर्धन करण्याच्या भूमिकेतून सयाजीरावांनी १८८८ मध्ये प्रयत्न सुरू केले. त्यादृष्टीने भारताच्या पुरातत्त्व खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी डॉ.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३३