पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बर्जेस आणि कझन यांच्या नेतृत्वाखाली संस्थानचे सर्वेक्षण करून घेतले. त्या सर्वेक्षणाच्या आधारे संस्थानातील महत्त्वाच्या स्मारकांचे वैशिष्ट्य सांगणारे दोन ग्रंथ तयार केले. हे दोन ग्रंथ बडोदा संस्थानच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आले. त्यापैकी त्यांनी १८८८ मध्ये 'The Antiquities of Dabhoi' तर १९०३ मध्ये 'The Architectural Antiquities of North Gujarat' हा ग्रंथ प्रकाशित केला. संस्थानातील स्मारकांच्या संवर्धनाच्या हेतूने सल्ला घेण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्यातील इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी संस्थानात निमंत्रित करण्यात येत होते. १९३३ साली बडोद्यात अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद आयोजित केली होती. या परिषदेत पुरातत्त्व खात्याची गरज ओळखून बडोदा संस्थानासाठी स्वतंत्र पुरातत्त्व विभागाची स्थापना करण्याचा ठराव करण्यात आला. पुढच्याच वर्षी म्हणजे १९३४ मध्ये बडोद्यात पुरातत्त्व विभागाची स्थापना करण्यात आली. या पुरातत्त्व खात्याच्या कामकाजाचे मुख्यतः तीन टप्यात वर्गीकरण केले आहे. पहिला टप्पा म्हणजे स्मारकांचे संवर्धन किंवा दुरुस्ती करणे, दुसरा टप्पा म्हणजे स्मारकांसंदर्भात संशोधन करणे. तर तिसरा टप्पा हा या स्मारकांची यादी करणे व इतर माहितीची नोंद ठेवणे हा होता.

 स्मारकांचे संवर्धन करत असताना गुजरातच्या उत्तरेकडील ठिकाणांचा समावेश केला होता. यामध्ये मोठेरा येथील सूर्यमंदिर, दाभोई येथील हिरा गेट आणि बडोदा गेट, बडोदा

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३४