पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राबविलेल्या विविध उपक्रमांवर आधारित १९३४-३५, १९३५- ३६, १९३६-३७, १९३७-३८ व १९३८-३९ या पाच वर्षांचे वार्षिक अहवालदेखील पुरातत्त्व विभागाने प्रकाशित केले. अभ्यासकांना व सर्वसामान्य लोकांना या अहवालांचा उपयोग व्हावा हा यामागील उद्देश होता.

 संस्थानातील प्राच्यविद्या संस्था आणि पुरातत्त्व विभाग हा धर्म खात्याच्या अधिकार क्षेत्रात येत होता. महाराजांच्या धर्म साक्षरतेच्या सर्व प्रयत्नांना आधारभूत असे काम या दोन संस्थांच्यामार्फत झाले आहे. कारण आपल्या अज्ञात इतिहासाची महत्त्वाची साधने या दोनच मार्गांनी उपलब्ध होऊ शकतात. आपला प्राचीन इतिहास हजारो वर्षांपूर्वीचे धर्मग्रंथ आणि पृथ्वीच्या पोटात गाडली गेलेली आपली संस्कृती यांच्या आधारेच शोधावा लागतो. महाराजांनी १२८ वर्षांपूर्वी यादृष्टीने केलेले काम त्यांच्या द्रष्ट्या इतिहासाभ्यासाची साक्ष आहे.

सयाजीरावांचे पथदर्शक धर्मविषयक कायदे

सयाजीरावांनी १९०१ मध्ये बडोदा संस्थानात धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा अमलात आणला. १८८३ मधील राजवाड्यातील खासगी खंडेरायाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करणे वा १८९० मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या लक्ष्मीविलास राजवाड्याच्या शिखरावर हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन यांसह ७ धर्माची तत्त्वे कोरणे या सर्व बाबी सयाजीरावांच्या विचारातील सर्व धर्मांप्रतिची आदराची भावना अधोरेखित करतात. १९०१

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३७