पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यासाठी नेमलेल्या व्यवस्थापकाला 'मुतवल्ली' (विश्वस्त) असे म्हणतात. धर्मादाय मिळकतीची व्यवस्था मूळ उद्देशाला धरून करण्याची व जमा खर्चाचे हिशेब बरोबर ठेवण्याची जबाबदारी मुतवल्लींवर होती; परंतु मुतवल्ली म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती ती धर्मादाय मिळकत आपल्या मालकीचीच आहे असे समजून तिचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करत असत. याशिवाय अशा मिळकतीची कोठेही नोंद नसल्यामुळे कोणती मिळकत धर्मादाय म्हणून दिली आहे हे समजणेही कठीण होत असे. ही दुर्व्यवस्था दुरुस्त करून मुस्लिम देवस्थानांना व मुतवल्लींना शिस्त लावण्याच्या उद्देशाने १९२७ मध्ये वक्फ कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे मुतवल्लींकडून धर्माच्या नावाखाली होणाऱ्या चुकीच्या आचरणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न महाराजांनी केला.

 संस्थानातील देवास्थानांपैकी ज्या मंदिरांना सरकारी मदत मिळत होती त्यांना सार्वजनिक देवस्थाने म्हटले जात असे, तर ज्या मंदिरांना सरकारकडून अत्यल्प मदत मिळत असे त्यांना खासगी देवस्थाने म्हणत. खासगी देवस्थानांपैकी कित्येक मंदिरे ही पैशासाठी घरातच मूर्तीची स्थापना करून त्याला मंदिरांचे नाव दिले जात असे. या दोन्ही प्रकारच्या देवस्थानातील उत्पन्नाचा व खर्चाचा हिशोब ठेवला जात नव्हता. त्यामुळे झालेला खर्च कोणत्या कारणासाठी केला, तो किती केला, एकूण रकमेपैकी किती रक्कम मूळ उद्देशावर खर्च केली याबद्दलची माहिती

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३९