पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संसदेत संन्यास दीक्षा प्रतिबंधक बिल संमत करण्याचे १९५७ व १९५९ मध्ये दोन वेळा प्रयत्न करण्यात आले. परंतु दोन्ही वेळेला भारतीय संसदेला आलेले अपयश कायदा निर्मिती आणि अंमलबजावणीच्या क्षेत्रातील सयाजीरावांचे 'अनन्यत्व' सिद्ध करते.

बडोद्याचे हिंदू कोड बिल

 भारतीय महिलांच्या उत्कर्षाचा मार्ग असणाऱ्या परंतु त्यासाठी महिलांबरोबरच स्वतः बाबासाहेबांनाही संघर्ष कराव्या लागलेल्या हिंदू कोड बिलातील सर्व ६ कायदे सयाजीरावांनी १९०५ ते १९३३ दरम्यान बडोद्यात लागू केले होते. भारतीय राज्यघटनेत या विषयाची चर्चा सुरू होण्याअगोदर ४५ वर्षे बडोद्यात हिंदू कोड बिलाची अंमलबजावणी सुरू झाली होती, तर उर्वरित भारतातील हिंदू महिलांना जे हक्क मिळायला ६०-७० वर्षे संघर्ष करावा लागला ते हक्क बडोद्यातील स्त्रियांना उर्वरित भारतातील हिंदू स्त्रियांच्या अगोदर ११५ वर्षे मिळाले होते. बडोद्याच्या या हिंदू कोड बिलाचे १) विवाह २) दत्तक ३) पालक आणि मुले ४) वारसा हक्क ५) कौटुंबिक संबंध ६) कौटुंबिक संपत्ती असे ६ घटक होते.

 बडोद्याच्या हिंदू कोड बिलातील पहिला कायदा हिंदू विवाह कायद्याच्या रूपाने १९०५ मध्ये लागू झाला. या कायद्यात हिंदू लग्नाच्या मूलतत्त्वांची व्याख्या करून, कायदेशीर लग्नाच्या अवश्य गोष्टी, स्त्री-पुरुषांचे परस्पर हक्क, त्यांचे मिळकतीवरील

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ४३