पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हिंदू कोड बिलासंदर्भातील दुसरा महत्त्वाचा 'हिंदू दत्तक नोंदणी कायदा' सयाजीरावांनी १९९० मध्ये बडोद्यात लागू केला. हिंदू धर्म परंपरेनुसार कोणत्याही व्यक्तीला केवळ त्याच्या रक्तसंबंधातील व्यक्तीलाच दत्तक घेता येत होते. तसेच प्रत्येक व्यक्तीला दत्तकप्रसंगी दत्तक होम विधी करणे बंधनकारक होते. १९१० च्या या कायद्यानुसार दत्तक होम विधीची प्रथा आणताना ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या सर्वांसाठी दत्तक होम विधी अनावश्यक ठरवण्यात आला. १९२७ मध्ये या कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार इतर सामान्य कायद्यांचे निर्बंध पाळून कोणताही सजातीय मुलगा दत्तक घेण्यास परवानगी देण्यात आली. पुढे १९२९ मध्ये बॅ. जयकर यांनी अशाच स्वरूपाची सुधारणा ब्रिटिश भारतातील कायद्यात सुचवणारे बिल मुंबई कायदे मंडळात आणले; परंतु ते मंजूर झाले नाही. लोकांची धर्म साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने दत्तक विधीबाबत माहिती देणारा 'दत्तकचंद्रिका' या ग्रंथाचा सुरतकर यांनी केलेला मराठी अनुवाद महाराजांनी प्रसिद्ध केला होता.

 १९३१ साली बडोद्यात हिंदू घटस्फोट कायदा अमलात आला. कोर्टात नोंदणी केल्याशिवाय घटस्फोट मान्य केला जाणार नाही अशी या कायद्यात तरतूद होती. या कायद्यानुसार कोणत्याही स्त्रीच्या पतीचा मृत्यू होऊन ७ वर्षे झाली असतील, त्याने संन्यास घेतला असेल, धर्मांतर केले असेल किंवा तो नपुंसक असेल तर त्या स्त्रीला अशा लग्नातून घटस्फोट मागण्याचा अधिकार होता.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ४५