पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८ मार्च १९६३ रोजी दैनिक मराठामध्ये महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त लिहिलेल्या अग्रलेखात प्र. के. अत्रे म्हणतात, “१९०५ साली महाराजांनी 'हिंदू कायदा' कोडाच्या स्वरूपात प्रसिद्ध करून जे ब्रिटिशांना हिंदुस्थानात शक्य झाले नाही, एवढेच नव्हे तर आता काँग्रेसच्या राज्यात कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांनाही करता आले नाही, ते त्यांनी करून दाखवले.” अत्रेंचे हे विश्लेषण आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीने स्वत:च्या परिपूर्ण प्रबोधनासाठी तातडीने समजून घेणे गरजेचे आहे.

सयाजीराव : जागतिक सर्वधर्म परिषदेचे एकमेव भारतीय
अध्यक्ष

 १८९३ ला शिकागो येथे झालेल्या पहिल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ऐनवेळी केलेले भाषण हा भारतीयांच्या गौरवाचा आणि कौतुकाचा विषय आहे. परंतु १९३३ मध्ये शिकागो येथेच झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव होते हा इतिहास सामान्य भारतीय सोडाच धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनासुद्धा माहीत नसावा ही बाब भारतासाठी नक्कीच कमीपणाची आहे. ज्याप्रमाणे विवेकानंदांचे भाषण गाजले होते त्याचप्रमाणे सयाजीरावांच्या भाषणाची चर्चा त्यावेळी अमेरिकेतील वृत्तपत्रांबरोबरच विद्वानांनीही केली होती. विशेष म्हणजे अध्यक्षपद महाराजांना वारंवार विनंती करून देण्यात आले होते. यावरून धर्मशास्त्राच्या अभ्यासातील महाराजांची जागतिक मान्यता स्पष्टपणे अधोरेखित होते.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ४७