पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारतातील आज अखेरचे सर्वांत पुरोगामी राज्यकर्ते आहेत असे विधान आपण प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच केले होते. वरील विश्लेषणावरून त्या विधानाची पूर्ण प्रचिती आपल्याला नक्की येईल. परंतु दुर्दैवाने भारतीय प्रबोधन परंपरेने आणि मुख्यतः महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमीने आपल्या या महान भूमिपुत्राकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्या पुरोगामी परंपरेची एकप्रकारे विटंबनाच केली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या तीन महापुरुषांनी धर्मसत्तेविरुद्ध केलेल्या बंडाचा त्याला संदर्भ असतो. आपल्याकडे शाहू महाराजांच्या वेदोक्ताच्या अनुषंगाने एका राजाने केलेला संघर्ष धगधगत्या निखाऱ्यासारखा आजही चर्चेत असतो. शाहू महाराजांनी धर्मसत्तेला पर्याय म्हणून मराठा छात्रजगद्गुरूपीठ स्थापन केले; परंतु वेदोक्त असो की छात्रजगद्गुरूपीठ आज आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा या प्रयत्नांच्या मर्यादा स्पष्ट होतात. त्या पार्श्वभूमीवर शाहुंचे समकालीन असणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या धर्मसुधारणा आणि मुख्यत: धर्म खाते आणि हिंदू पुरोहित कायदा हे प्रयत्न आजसुद्धा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतात. सयाजीरावांच्या या सर्व कामामुळे ते भारताच्या सीमा ओलांडून जागतिक धर्म प्रबोधन परंपरेत सुद्धा पथदर्शक ठरतात.

᛫᛫᛫
महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ४८