पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अखेरच्या २०० वर्षांच्या आधुनिक भारताच्या इतिहासातील सयाजीराव हे एकमेव राज्यकर्ते आहेत.

 सयाजीरावांनी आपल्या ६२ वर्षांच्या राज्यकारभारात धर्मसुधारणेचे 'महासाक्षरता अभियान' अत्यंत शांतपणे आणि आपल्या राज्यकारभाराच्या मुख्य धोरणाचा भाग म्हणून अत्यं रचनात्मक पद्धतीने राबविले. प्रबोधन, कृतिशीलता, कायदा अशा एकत्रित प्रयत्नातून महाराजांनी हे अभियान यशस्वी केले. येथे एक बाब नोंद घेण्यासारखी आहे ती अशी की, भारतातील धर्मसुधारणांचे प्रयत्न संख्येने अधिक असले तरी ते अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यापर्यंत जाण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. स्वतंत्र धर्म खाते सुरू करणारे सयाजीराव हे आधुनिक भारतातील पहिले प्रशासक आहेत. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा सयाजीरावांच्या धर्म खात्याची चर्चा करतो तेव्हा धर्म खाते सुरू करण्यागोदर आणि धर्म खाते सुरू झाल्यानंतर महाराजांच्या मृत्यूपर्यंत बडोद्यात झालेल्या सर्व धर्मसुधारणा जोडून विचारात घेणे अनिवार्य ठरते. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात १९१७ ला स्वतंत्र धर्म खात्याची स्थापना केली असली तरी १८७७ पासूनच महाराजांनी संस्थानात धार्मिक सुधारणा करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली होती. त्यामुळेच स्वतंत्र धर्म खात्याचा विचार करत असताना सयाजीरावांनी १८७७ पासून धर्म सुधारणेसाठी केलेले विविध प्रयत्न समजून घेणे अपरिहार्य ठरते.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ७