पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अगोदरपासून करत होते. ही काही उदाहरणे पाहता क्रांतिकारक परिवर्तनाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रबोधनाला पुरेसा वेळ देणे किती गरजेचे असते हे महाराजांच्या परिपूर्ण प्रयत्नातून लक्षात येते.
 राजर्षी शाहूंनी १९०१ मध्ये राजवाड्यातील सर्व विधी वेदोक्त पद्धतीने करण्याचा आदेश काढला. राजघराण्यातील सर्व विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास ब्राह्मण पुरोहितांचा विरोध असल्याने राजर्षी शाहूंनी आपल्या स्वभावाप्रमाणे बेधडकपणे राजवाड्यातील विधी करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांऐवजी मराठा पुरोहितांची नेमणूक केली. ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी राजर्षी शाहूंनी हा निर्णय घेतला. त्यानुसार मराठा पुरोहित राजवाड्यातील विधी करू लागले. राजवाड्यातील वेदोक्त विधी करणारे हे मराठा पुरोहित स्वतःच्या घरातील धार्मिक विधी करण्यासाठी मात्र ब्राह्मण पुरोहितांना बोलावत. जनतेच्या धार्मिक प्रबोधनाशिवाय नियम लागू केल्याचा हा परिणाम होता.
जगातील एकमेव ' हिंद पुरोहित कायदा

 हिंदू पुरोहित कायदा लागू करण्यापाठीमागील सयाजीरावांची भूमिका समजून घेण्यासाठी महाराजांनी १९०७ मध्ये भोर येथे केलेले भाषण मार्गदर्शक ठरते. भोर संस्थानात ८ सप्टेंबर १९०७ रोजी केलेल्या भाषणात सयाजीरावांनी ब्राह्मण पुरोहित वर्गाच्या धोरणाची जी चिरफाड केली आहे ती अत्यंत मर्मभेदी आहे.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १४