पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुराणिकांची पहिली परीक्षा घेण्यात आली. कोणतीही सुधारणा करत असताना सुधारणेशी संबंधित सर्व घटकांना त्या प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचे धोरण सयाजीरावांनी प्रत्येक बाबीत जाणीवपूर्वक राबवले. त्यांच्या या धोरणानुसार २२ मे १९१३ रोजी हिंदू पुरोहित बिल प्रसिद्ध करून त्यावर समाजातील विविध घटकांच्या सूचना मागवण्यात आल्या.
 १९१३-१४ मध्ये धारा सभेची २ अधिवेशने आयोजित करण्यात आली होती. यापैकी १३-१५ एप्रिल १९९४ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या धारा सभेच्या सत्रात हिंदू पुरोहित कायद्याच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेवेळी देवासचे महाराज उपस्थित होते. दुसऱ्या 'दिवशी सयाजीरावांनी या चर्चेला हजेरी लावली होती. धारा सभेतील या चर्चेनंतर जनतेच्या सूचनांसाठीचा वेळ वाढवून देण्यात आला. जनतेकडून करण्यात आलेल्या सूचनांनुसार पुरोहित बिलामध्ये दोनवेळा सुधारणा करण्यात आल्या.

 बिलावरील चर्चेला पुरेसा वेळ देवून आणि विविध घटकांकडून करण्यात आलेल्या सूचनांनुसार योग्य ते बदल करून ३० डिसेंबर १९१५ रोजी बडोदा जिल्ह्यात हिंदू पुरोहित कायदा लागू करण्यात आला. धार्मिक विधी करण्यासाठी योग्य धार्मिक शिक्षण घेतलेले पुरोहित तयार करणे हा या कायद्याचा उद्देश कायद्याच्या उद्देशपत्रिकेत नमूद करण्यात आला होता. पुढे १४ सप्टेंबर

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १६