पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९३४ ला हा कायदा संपूर्ण संस्थानात लागू करण्यात आला. सामाजिक सुधारणा करण्याआधी समाजाची मानसिक तयारी झाली नसल्यास सामाजिक सुधारणांचे प्रयोग अपयशी ठरल्याचे अनेक दाखले आपल्याला भारतीय इतिहासात सापडतात. १९१५ मध्ये बडोदा संस्थानात लागू करण्यात आलेल्या या कायद्याला श्रावणमास दक्षिणा सुधारणांची पार्श्वभूमी लाभली होती.

 हिंदू पुरोहित कायद्यानुसार बडोदा संस्थानात पौरोहित्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना बडोद्यातील हिंदू पुरोहित परीक्षा, याज्ञिक विषयातील किंवा श्रावणमास दक्षिणा परीक्षा यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले. या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून प्रशस्तीपत्र दिले जाई. हे प्रशस्तीपत्र मिळवणाऱ्या व्यक्तीलाच बडोदा संस्थानात पौरोहित्य करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. केवळ परंपरेने चालत आलेला व्यवसाय म्हणून कुणालाही पौरोहित्य करता येणार नाही अशी व्यवस्था या कायद्याने करण्यात आली. जगभरातील विविध धर्मांच्या इतिहासाचा विचार करता आजवर धर्मसत्ता ही नेहमीच राजसत्तेला वरचढ ठरल्याचे आपण जाणतो. अशा परिस्थितीत परंपरेने धर्मविधी करणाऱ्या पुरोहितांच्या धार्मिक ज्ञानाची तपासणी करण्यासाठी परीक्षा घेण्याचा सयाजीरावांचा निर्णय क्रांतिकारक ठरतो.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १७