पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्राह्मणांची मक्तेदारी संपुष्टात आली. पौरोहित्यासाठी परीक्षा बंधनकारक करत असतानाच या परीक्षेद्वारे प्राप्त परवान्याला कालमर्यादादेखील घालण्यात आली. सुरुवातीला एकदा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ५ वर्षे पौरोहित्य करण्याची मुभा या कायद्यांतर्गत देण्यात आली होती. नंतरच्या काळात ही मर्यादा ३ वर्षांवर आणि शेवटी १ वर्षांवर आणण्यात आली. पौरोहित्य करण्यासाठी दरवर्षी होणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन परवाना मिळवणे पुरोहितांना बंधनकारक बनले. या एक वर्षाच्या कालमर्यादेमुळे पुरोहितांना दरवर्षी आपले धर्मविषयक ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक झाले.

 नव्याने पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तींचे ज्ञान तपासतानाच परंपरेने पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनादेखील सयाजीरावांनी ही परीक्षा ६ वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे बंधनकारक केले. पुरोहित परीक्षेसाठी नेमण्यात आलेला अभ्यासक्रम समजून घेणे येथे आवश्यक ठरेल. या परीक्षेसाठी वेदपाठ, श्रौत व स्मार्त, याज्ञिक, वेदार्थकथन, तंत्रशास्त्र, धर्मशास्त्र, पूर्वमीमांसा, वेदांत, व्याकरण, न्यायशास्त्र, साहित्य, ज्योतिष, आयुर्वेद, सप्रयोग पुराण व सप्रयोग कीर्तन असा अभ्यासक्रम नेमण्यात आला होता. पुरोहित परीक्षेसाठी नेमण्यात आलेला हा अभ्यासक्रम विचारात घेतला तर पुरोहितांना दरवर्षी कराव्या लागणाऱ्या तयारीची आपल्याला कल्पना येते.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १९