पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सरकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन पौरोहित्य करणाऱ्या परवानाधारक पुरोहितांना ते करत असलेल्या धार्मिक विधीचा शास्त्रार्थ यजमानाला त्याच्या मातृभाषेत समजावून सांगण्याचे बंधन पुरोहित कायद्यात घालण्यात आले. स्वत:च्या घरात केल्या जाणाऱ्या धर्मविधींचा अर्थ यजमानांना कळावा आणि त्यांची धर्मविषयक समज वाढावी हा या नियमामागील प्रमुख उद्देश होता. आजवर बहुजन समाजासाठी गूढ राहिलेल्या धर्म विधी प्रक्रिया आणि मंत्रांविषयीची भीती कमी होण्यास या नियमामुळे मदत झाली. सध्या सत्यनारायण पूजा, शांतीचे विधी, वास्तुशांती इ. धार्मिक विधींचा आज येणारा अनुभव आपण डोळ्यासमोर आणला तर पुरोहित कायद्यामागील सयाजीरावांच्या क्रांतिकारक दूरदृष्टीची आपल्याला कल्पना येते.
 पुरोहितांनी करावयाच्या धार्मिक विधींबाबत केवळ नियम करून स्वस्थ न बसता या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याकडे सयाजीरावांनी विशेष लक्ष दिले. परवानाधारक पुरोहिताला कायदाभंगाच्या प्रकरणात बडोदा सरकारने नियुक्त केलेल्या न्यायासनासमोर उपस्थित राहणे अनिवार्य होते. कायद्याचा भंग करणाऱ्या पुरोहितावर न्यायालयात खटला चालवण्याचे अधिकार सरकारला होते.

 विनापरवाना पौरोहित्य करणाऱ्या अथवा विधींवेळी यजमानांना मंत्रांचा अर्थ त्यांच्या मातृभाषेत समजावून न सांगणाऱ्या पुरोहितांना २५ रु. दंडाची तरतूद पुरोहित कायद्यात

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २०