पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुढे १९२८ मध्ये हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून विवाहाविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराथी व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात यावे, ते भाषांतर वधू-वरांच्या मातृभाषेत लग्न लावणाऱ्या पुरोहिताने वाचून समजावून सांगावे व तसे न केल्यास त्याला ५० रु. दंड करण्याची तरतूद केली. हिंदू विवाह कायद्यातील हा बदल म्हणजे पुरोहित कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा एक सकारात्मक प्रयत्न होता.
हिंद पुरोहित कायद्यातील सवलती
 पुरोहित कायदा लागू करत असताना यामध्ये पुढील काही बाबींमध्ये सवलती देण्यात आल्या.
 १) पुरोहित कायदा लागू झाल्याच्या तारखेच्या १२ वर्षे अगोदर धर्मशिक्षण घेतलेल्या पुरोहितांना सुरुवातीच्या काळात या कायद्यातून वगळण्यात आले.
 २) एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी बडोद्यात वास्तव्यास आलेल्या बडोद्याबाहेरील पुरोहितांना हा कायदा लागू करण्यात आला नाही.
 ३) एखाद्या समाजात वा ठरावीक भौगोलिक क्षेत्रात सरकारी परीक्षा उत्तीर्ण झालेला एकही परवानाधारक पुरोहित उपलब्ध होत नसल्यास त्या समाजातील परंपरेने पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्यात आली.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २२