पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४) एखाद्या वेळी सामूहिकरीत्या धार्मिक विधी करत असताना पुरेशा प्रमाणात परवानाधारक पुरोहित न मिळाल्यास धर्मविधींना अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अशा सामूहिक धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानाधारक पुरोहितांची अट शिथिल करण्यात आली होती. कायदा लागू करत असताना समाजमत या सुधारणांच्या विरोधात जाणार नाही याची घेतलेली काळजी पुरोहित कायद्यात देण्यात आलेल्या या सवलतीवरून आपल्याला दिसून येते. अपवादात्मक परिस्थितीत परवाना नसलेल्या पुरोहितांकडून करण्यात आलेल्या विधींच्या कायदेशीरपणाबाबत शंका उपस्थित होण्याची शक्यता होती. विनापरवाना पुरोहितांकडून करण्यात आलेल्या धार्मिक विधींची वैधता या कायद्यातील विशेष तरतुदीच्या आधारे कायम ठेवण्यात आली.
 ५) बडोदा सरकारकडून निश्चित केलेल्या अंत्यविधी व इतर काही विशेष धर्मविधींना हा परवानाधारक पुरोहितांचा नियम लागू करण्यात आला नाही. तसेच बडोदा सरकारने काही विशेष कारणास्तव सूट दिलेल्या व्यक्तीला पुरोहित कायद्यात निर्धारित केलेल्या परीक्षेच्या नियमातून वगळण्यात आले होते. समाज परिवर्तन घडवू इच्छिणारा बदल अमलात आणताना कायद्याच्या धाकापेक्षा समाजाच्या मानसिकतेतील बदलाच्या जोरावर तो बदल घडवण्याकडे असणारा सयाजीरावांचा कल पुरोहित कायद्यात दिलेल्या सवलतींवरून स्पष्ट होतो.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २३