पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्यावर तमाम खऱ्या नागरी शासन व्यवस्था तसेच दोहोंच्याही मान्यता अवलंबून असतात.” त्यामुळे मी जेव्हा जीवनाचे हे प्राचीन नियम रद्द करा असा आग्रह धरतो त्याचवेळी त्यांची जागा तत्त्वाचा धर्म हाच खरा धर्म असल्याचा दावा करू शकत असल्यामुळे त्याने घ्यावी यासाठी मी आतूर आहे. खरोखरच धर्माच्या आवश्यकतेबाबत माझी एवढी खात्री पटली आहे की, या धर्मसुधारणेअंतर्गत काय आवश्यक बाबी असाव्यात याची रुपरेषा आपणा समोर मांडलीच पाहिजे असे मी समजतो. माझ्या मते या सुधारणांमध्ये पुढील मुद्दे मुख्य असावे :
 (१) सर्व हिंदूना स्वीकारार्ह आणि मान्य असा एकच प्रमाण धर्मग्रंथ असावा. याचा अर्थ असा की हिंदू धर्माचे वेद, शास्त्र, पुराणे यासारखे पवित्र आणि प्रमाण मानले गेलेले इतर सर्व ग्रंथ कायद्याने रद्द केले पाहिजेत आणि त्या ग्रंथातील धार्मिक किंवा सामाजिक सिद्धांतांची शिकवण देणे दंडनीय ठरविले पाहिजे.

 (२) हिंदूंमधल्या पुरोहितशाहीचे निर्मूलन झाले तर चांगलेच. परंतु हे अशक्य दिसते म्हणून किमान पुरोहितपद वंशपरंपरागत नसावे. स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुरोहितपदासाठी पात्र मानले पाहिजे. सरकारने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आणि त्याला तो व्यवसाय करण्याची सरकारी सनद असल्याशिवाय पौरोहित्य करता येणार नाही अशी कायद्यामध्ये तरतूद करावी.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २५