पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



होता आणि बडोद्याच्या १९१०-११ ते १९१६-१७ या पाच वर्षातील ‘Administrative Report' मध्ये त्याच्या निर्मितीच्या आणि तरतुदीच्या सर्व टप्प्यांची माहिती उपलब्ध आहे. तरीही या कायद्यातील कलमांची बाबासाहेबांनी संदर्भात न देता केलेली वरील मांडणी धक्कादायक आहे.
 कारण १९०७ पासून पुढे १९१७ पर्यंत सयाजीरावांच्या शिष्यवृत्तीवर बाबासाहेबांचे भारत, अमेरिका आणि इंग्लंड येथील शिक्षण झाले होते. १९१७ मध्ये काही दिवस बडोदा संस्थानात त्यांनी नोकरीही केली होती. सयाजीरावांवरील मृत्युलेखात सयाजीरावांनी केलेल्या कायद्यांना त्यांनी इंग्लंड, अमेरिकेपेक्षा पुढारलेले कायदे म्हणून हा निबंध प्रकाशित झाल्यावर तीन वर्षांनी म्हणजेच १९३९ मध्ये गौरवले होते. या सर्व पार्श्वभूमीवर 'हे असे का झाले?' हा प्रश्न आपल्याला छळत राहतो.

स्वित्झर्लंडमधील संशोधक जोहेन्स बेल्ट्झ यांनी २००५ मध्ये प्रकाशित आपल्या Mahar, Buddhist and Dalit या ग्रंथात Annihilation Of Caste मध्ये बाबासाहेबांनी धर्मसुधारणेसाठी मांडलेल्या पाच कलमी कार्यक्रमाचे मूल्यमापन केले आहे. या ग्रंथात जोहेन्स बेल्ट्झ म्हणतात, “This is where we see the emergence of a programme for fundamental and revolutionary reconstruction of Indian society." जोहेन्स बेल्ट्झ बाबासाहेबांच्या या कार्यक्रमाला मूलभूत आणि भारतीय समाजाची क्रांतिकारक पुनर्बांधणी करणारा ठरवतात.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / २७