पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आधुनिक भारतातील प्रबोधन परंपरेच्या केंद्रस्थानी हिंदू धर्म चिकित्सा हा विषय होता. राजा राममोहन रॉय यांच्यापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत १०० वर्षाहून अधिक काळ हिंदू धर्माची टीकात्मक समीक्षा करणारी एक सशक्त परंपरा दिसते. यामध्ये हिंदू धर्मात सुधारणा करण्यापासून ते हिंदू धर्म नाकारण्यापर्यंत विविध वळणे येऊन गेली. यामध्ये हिंदू धर्मातील प्रथा, रूढी आणि कर्मकांडे यांच्यातील फोलपणा मांडणारे धर्मचिकित्सक जसे होते तसे हिंदू धर्मग्रंथातील ब्राह्मणी राजकारण उघड करत ब्राह्मणांवर टोकाची टीका करणारेही धर्मचिकित्सक होते.

 या दोन्ही परंपरांच्या मध्ये धर्मसाक्षरतेचा 'सयाजीमार्ग' संवादी समाजजीवनाचा राजमार्ग म्हणून अतिशय सक्षमपणे विकसित होत होता. दुर्दैवाने भारतातील धर्मचिकित्सेच्या सर्वच परंपरांनी धर्मसाक्षरतेच्या या राजमार्गाकडे चुकूनही पाहिले नाही. परंतु भारतीय धर्मचिकित्सेचा इतिहास तपासला असता भारतातील सकारात्मक धार्मिक परिवर्तनाचा सयाजीमार्ग हा सर्वात क्रांतिकारक प्रयत्न होता हे सिद्ध करणारे अनेक नवे पुरावे पुढे येत आहेत. त्यामध्ये सर्वात ठोस पुरावा म्हणून बडोद्याच्य हिंदू पुरोहित कायद्याची दखल घ्यावी लागेल.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / ७