पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संक्रमित ठिकाणाहून आलेल्या लोकांपासून प्लेगचे संक्रमण रोखण्यासाठी ३ तात्पुरत्या स्वरूपाचे दवाखाने सुरू केले. प्लेग झालेल्या रुग्णांच्या राहण्याच्या सोयीसाठी व त्यांच्या उपचारासाठी तीन प्लेग रुग्णालये सुरू केली. तर प्लेगग्रस्त रुग्णांना ठेवण्यासाठी विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या १९ प्लेग शेड बांधण्यात आल्या.

 फेब्रुवारी १८९८ ला बडोदा शहरात तीन आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. रोगप्रतिबंधक लसीकरणाला उत्तेजन देण्यासाठी बडोदा सरकारने नियमित लसीकरणाची सोय केली. राज्यात याप्रकारे ६,५५१ व्यक्तींचे लसीकरण केले. संसर्गग्रस्तांना शोधणे, गावाबाहेर बांधलेल्या शेडमध्ये ठेवणे ( त्यांचे विलगीकरण करणे), तेथे त्यांच्यावर उपचार करणे, त्यांचा इतरांशी संपर्क तोडणे, संक्रमित घरांचे शुद्धीकरण करणे, स्वच्छता व वायुविजन ( ventilation) करणे. पहिल्यांदा संक्रमित व्यक्तीला दहा दिवस वेगळे ठेवणे (quarantine) नंतर वीस दिवस ठेवणे या उपाययोजना करण्यात आल्या. १८९९ मध्ये प्लेगसाठी ३२ प्लेग रुग्णालये तात्पुरती सुरू करण्यात आली. १९०० मध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शमसुद्दीन सुलेमानी यांनी प्लेगवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशिष्ट प्रकारच्या औषधी गोळ्या बनविल्या व त्या लोकांना मोफत वाटल्या. १९०८ मध्ये प्लेगच्या रोगप्रतिबंधक लसीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुंबईला पाठविले.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १३