पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यायामशाळा

 सयाजीरावांनी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाबरोबरच संस्थानातील इतर नागरिकांच्या व्यायामासाठी खाजगी आखाड्यांना आर्थिक पाठबळ पुरवून प्रोत्साहन दिले. १९२७-२८ मध्ये संस्थानातील ३५ आखाड्यांना एकूण ५,२१९ रु. चे अनुदान बडोदा सरकारमार्फत देण्यात आले. १९२९-३० ला ५० आखाड्यांना ५,४८८ रुपये अनुदान मंजूर केले होते. १९३०-३१ मध्ये खाजगी आखाड्यांना ८,००० रु. मंजूर केले. १९३१-३२ मध्ये ८,००० रु. अनुदान तर १९३२-३३ ७८ खाजगी आखाड्यांना दरम्यान ८,००० रु. अनुदान देण्यात आले. यावर्षी या खाजगी आखाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. पुढे १९३३-३४ मध्ये १०९ खाजगी आखाड्यांना सरकारने ५,५०० रुपये अनुदान दिले. १९२७-२८ आणि १९२९-३० ते १९३३-३४ अशा ६ वर्षांच्या काळात सयाजीरावांनी बडोद्यातील आखाड्यांना ४०,२०७ रु. अनुदान दिले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १० कोटी २९ लाख रु.हून अधिक भरते. आपल्या संस्थानातील प्रजेला आरोग्यसंपन्न करण्यासाठी सयाजीरावांइतके 'रचनात्मक' प्रयत्न आधुनिक भारतातील अन्य कोणत्याही राज्यकर्त्याने केलेले आढळत नाहीत.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २२