पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीराव महाराज हे 'सर्व क्षेत्रात सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास घेतलेले प्रशासक होते. महाराजांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या-त्या क्षेत्रात जागतिक मानदंड प्रस्थापित केले. आपली प्रजा जागतिक मानदंडात जीवन जगणारी असावी. या भूमिकेतून आरोग्यविषयक जगभरातील सर्वोत्तम सुविधा महाराजांनी बडोद्यात निर्माण केल्या. लहान मुले, स्त्रिया, वृध्द, विविध प्रकारचे विकलांग अशा सर्वांच्या आरोग्यासाठी महाराजांनी कायमस्वरूपी उपाययोजना अवलंबिल्या. फक्त आपली प्रजाच नव्हे तर आपल्या राज्यातील पशुधनाचे आरोग्यही सदृढ राहावे यासाठीसुध्दा पशुवैद्यकीय सुविधांची उत्तम यंत्रणा महाराजांनी निर्माण केली. स्वत:च्या आरोग्याइतकीच आपल्या राज्याच्या आरोग्याची काळजी घेणारा सयाजीरावांच्या तोडीचा प्रशासक आधुनिक भारताच्या इतिहासात दुसरा सापडत नाही यातच 'सयाजी चिंतना'ची आपली गरज अधोरेखित होते.
प्रजेचे आरोग्य : राष्ट्रीय कर्तव्य
 प्रजेचे आरोग्य आणि व्यायाम संवर्धन याकडे सयाजीराव राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सयाजीरावांनी सार्वजनिक आरोग्याचे संवर्धन योग्य रीतीने होण्यासाठी राबवलेला चतु:सूत्री कार्यक्रम होय.
 १. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, मलापहरणाची व सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था करणे.

 २. खाद्यपदार्थ व दूध यांच्या विक्रीवर देखरेख ठेवणे व नियंत्रण करणे.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ७