पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांनी नोंदवली आहे. यावेळीच सत्यशोधकांच्या काही शाळांमध्ये महाराज उपस्थित राहिले होते. सत्यशोधक समाजाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या शाळेला महाराजांनी बरीच वर्षे दरमहा १०० रुपये देणगी दिली.
 रामजी संतूजी आवटे आणि धामणस्करांनी मिळून १८९६ च्या दरम्यान बडोद्यात माधवराव पवार यांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरू केला. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचे 'क्षत्रिय व त्यांचे अस्तित्व' हे पुस्तक सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले. १७ फेब्रुवारी १९३० रोजी महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सत्यशोधक समाजाच्या काही कार्यकर्त्यांची व्याख्याने जनतेसाठी मुद्दाम ठेवली होती. या व्याख्यानांना महाराज स्वत: हजर होते. यावेळी नारो बाबाजी महागट यांना मदत म्हणून २०० रु. रोख दिले होते.

 मॅक्स मुल्लरने भाषांतरित केलेल्या 'सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट' या मालेत प्रकाशित केलेल्या बारापैकी सात उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याचे काम सयाजीरावांनी सत्यशोधक विचारधारेच्या केळूसकरांवर सोपवले. हे भाषांतर करत असताना केळूसकरांनी मॅक्स मुल्लरऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांवरून ते केले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेतर ठरतात. कोल्हापूर संस्थानचे दिवाण भास्करराव जाधव सयाजीरावांच्या आश्रयाने सुरू असलेल्या गंगारामभाऊ

महाराजा सयाजीराव: कृतीशील सत्यशोधक / १२