पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदर्श मानत होते तर सयाजीराव आपल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या धोरणांमध्ये कौशल्याने आणि कोणताही गाजावाजा न करता 'फुलेविचार' विकसित करून पेरत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुले विचाराबाबतची सायाजीरावांची कृतिशीलता अतिशय लक्षणीय आहे.

 जोतीबा फुले यांचा उल्लेख महाराज नेहमी महात्मा असा करत. १८८८ मध्ये महाराजांनी केलेल्या सूचनेनुसार मुंबईमधील सत्यशोधक कार्यकर्त्यांनी जोतीरावांना 'महात्मा' ही पदवी अर्पण केली. सयाजीरावांबद्दल महात्मा फुल्यांना असणारा आदर फुल्यांनी एक अखंड लिहून व्यक्त केला. हा अखंड त्यावेळी दीनबंधू वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता. फुल्यांनी पत्राद्वारे मागणी करून सयाजीरावांचा फोटो हवा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महाराजांनी आपला राजवेषातील फोटो फुल्यांना पाठवला. परंतु त्याऐवजी साध्या वेशातील फोटो मागवून तो फुल्यांनी त्यांच्या बैठकीच्या खोलीत लावला होता. महात्मा फुल्यांनी सयाजीरावांचा फोटो आपल्या बैठकीच्या खोलीत लावणे यातच पुरोगामी महाराष्ट्राचा 'खरा' इतिहास लपला आहे. महाराष्ट्र जेवढ्या लवकर हे वास्तव स्वीकारेल तेवढे ते महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी पोषक ठरेल.

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / २३