पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांची अनिर्वायता
 हा सर्व इतिहास जाणून घेताना होणाऱ्या आनंदापेक्षा होणाऱ्या वेदनाच 'भयंकर' आहेत. कारण गेली ६० वर्षे फुले नावाच्या ' खळ्या'भोवती 'रिंगण' घालण्यातच आम्ही धन्यता मानली. फुले विचाराचा गाभा असणाऱ्या या 'मूळ'खळ्यापर्यंत मात्र आम्ही पोहोचलोच नाही. परिणामी फुल्यांच्या विचाराला कृतिशील करणारे सयाजीराव आमच्यासाठी अज्ञात राहिले. फुले विचारातील कालबाह्य घटकांना पर्याय देऊ शकणारे सयाजीचिंतन ‘जोडून' घेण्याची प्रक्रिया आम्ही स्वीकारली नाही. फुले विचार म्हणजे 'संकटकाळी बाहेर पडण्याचा रस्ता' अशी 'तात्पुरती सोय' म्हणून आम्ही स्वीकारला. फुले अभ्यासकांचा श्रेष्ठत्व गंडाने 'पछाडलेला' आत्मकेंद्री ' अहंकार' जोपासण्यासाठी फुले विचार प्रवाह संकुचित केला गेला. त्यातून त्याला साठलेपण आले. हे साठलेपणच त्याला निस्तेज आणि कालबाह्य करण्यास कारणीभूत झाले.

 अपवाद फक्त कॉ. शरद पाटलांचा. कॉ. पाटलांनी मुख्यतः फुल्यांच्या तत्त्वचिंतनातील काळ आणि ज्ञानाच्या मर्यादा निर्भीडपणे पुढे आणून 'कालबाह्य फुले सोडण्याची आणि कालसुसंगत फुल्यांचा विकास करण्याची' भूमिका घेत फुल्यांच्या तत्त्वज्ञानाला जात आणि स्त्रीदास्यांतक भूमिकेतून ‘अद्ययावत’ केले. आपल्या उर्वरित 'पुरोगामी' अभ्यास परंपरेने मात्र वि.का. राजवाडेंचा आदर्श प्रमाणभूत मानला. वि. का.

महाराजा सयाजीराव: कृतीशील सत्यशोधक / २४