पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९४०-४१ मध्ये बडोद्यात मुलींसाठीच्या चार अँग्लो- व्हर्नाक्युलर शाळा कार्यरत होत्या. याचवर्षी बडोदा संस्थानातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्या २,९५९ होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना बडोदा सरकारकडून सढळ हाताने शिष्यवृत्ती देण्यात असे. बालविवाह प्रतिबंधक कायदा मोडणाऱ्यांकडून घेण्यात येणारी दंड स्वरूपातील रक्कम प्राथमिक शाळेतील मुलींना शिष्यवृत्ती देण्यासाठी वापरली जाई.
 बडोद्यात उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी सयाजीरावांनी १८८२ मध्ये बडोदा कॉलेजची स्थापना केली. १९३५ मध्ये बडोदा कॉलेजमध्ये १,०९७ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी ३३ विद्यार्थिनी पदव्युत्तर व ४८ विद्यार्थिनी पदवीचे शिक्षण घेत होत्या. सर्वसामान्य लोकांना आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्याची प्रेरणा मिळावी म्हणून सयाजीरावांनी आपली कन्या इंदिराराजे यांना उच्च शिक्षणासाठी बडोदा कॉलेजमध्ये पाठविले.

 जेव्हा पुरुषांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची बाब दुर्मिळ होती तेव्हा सयाजीरावांनी महिलांना शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविले. सयाजीरावांनी मिस राधाबाई पोवार यांना अध्यापनशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी १९१४-१५ मध्ये अमेरिकेच्या टीचर्स कॉलेजमध्ये पाठविले व दोन वर्षासाठी वार्षिक १५० रु. वेतन दिले. १९१७-१८ मध्ये स्नेहलता पगार यांना बालसंगोपनशास्त्रातील उच्च शिक्षणासाठी सरकारी खर्चाने

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / ११