पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचा मान असणाऱ्या सावित्रीबाईंना १८९० मध्ये महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सयाजीरावांनी महिन्याला ५० रु. पेन्शन सुरू केली. फुल्यांचे दत्तक पुत्र यशवंत महाराजांच्या या मदतीमुळेच डॉक्टर होऊ शकले. १८९२ मध्ये सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह बडोदा वत्सल प्रेसने प्रकाशित केला होता. पडदा पद्धतीमुळे ज्या मुली किंवा स्त्रिया सर्वसामान्य शाळांत जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हत्या व सक्तीच्या शिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या वयोमर्यादेपेक्षा ज्यांचे वय जास्त होते अशा स्त्रियांपर्यंत शिक्षण पोहोचून त्या बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी ठिकठिकाणी झनाना वर्ग सुरू करण्यात आले. विशेष बाब म्हणजे चाळीस वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांनाही या वर्गात प्रवेश दिला जात असे.
महिलांसाठी ग्रंथालये

 महिलांना केवळ साक्षर करून न थांबता त्यांचा वैचारिक विकास करण्यासाठी सयाजीरावांनी बडोद्यात ग्रंथालय चळवळ सुरू केली. १९०७ साली महिला ग्रंथालय स्थापन करून महिला ग्रंथपालाची नेमणूक करण्यात आली. हा संपूर्ण भारतातील पहिला प्रयोग होता. १९१२ पासून या ग्रंथालयाने फिरत्या ग्रंथालयाच्या पुरस्कारासह महिला ग्रंथपालांनी शहरातील विविध महिलांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. १९१७-१८ मध्ये महिला ग्रंथालयातील पुस्तकांच्या देवाणघेवाणीची संख्या

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १३