पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यापक व्हावा, त्यांचा सामाजिक अवकाश विस्तारून त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी या उद्देशाने २० फेब्रुवारी १९१५ ला ‘श्री महाराणी चिमणाबाई स्त्री समाजा'ची स्थापना करण्यात आली. श्री. मनोरमा दिघे यांच्या नेतृत्वाखाली १९१५ साली जुम्मादादा व्यायाम मंदिरात 'कन्या आरोग्य मंदिरा'ची स्थापना करण्यात आली. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करणारे भारतातील पहिले बडोदा संस्थान सयाजीरावांच्या आधुनिक विचारांची साक्ष देते.

 स्त्रियांना स्वावलंबी व त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी १९१७ मध्ये 'स्त्री उद्योगालया'ची स्थापना करण्यात आली. या उद्योगालयाने महिलांविषयीचे विविध उद्योग आणि तांत्रिक शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाची सोय करून दिली. स्त्री उद्योगालयाने भारतातील स्त्रियांचा पहिला आनंदमेळा भरविला. १९३८ मध्ये उद्योगालयाच्या इमारतीसाठी सर सयाजीराव डायमंड ज्युबिली फंडातून ३०,००० रुपये देणगी देण्यात आली. १९३९ मध्ये स्त्री उद्योगालयाने डिप्लोमा परीक्षेसाठी येणाऱ्या खेड्यातील स्त्रियांसाठी वसतिगृहाची सोय केली. दरवर्षी जवळजवळ २०० स्त्रिया या उद्योगालयात प्रवेश घेत असत. स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराजांनी अशा वस्तूंच्या प्रदर्शनांचे आयोजनही केले होते.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १८