पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 बाळाच्या जन्मावेळी दाई हजर असण्याचे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि दाईप्रती असणारा निष्काळजीपणा व केले जाणारे दुर्लक्ष यावर मात करण्यासाठी १६ ऑक्टोबर १९१९ रोजी बडोद्यात 'दाई कायदा' लागू करण्यात आला. या कायद्यानुसार परिचारिका प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही महिलेला सुइणीचे काम करण्याची परवानगी नव्हती. परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून एखाद्या रुग्णालयात कामाचा अनुभव घेतल्यानंतरच त्या स्त्रीला परिचारिकेचा परवाना दिला जात होता.
 १९३१ साली बडोद्यात हिंदू घटस्फोट कायदा अमलात आला. कोर्टात नोंदणी केल्याशिवाय घटस्फोट मान्य केला जाणार नाही अशी या कायद्यात तरतूद होती. या कायद्यानुसार कोणत्याही स्त्रीच्या पतीचा मृत्यू होऊन ७ वर्षे झाली असतील, त्याने संन्यास घेतला असेल, धर्मांतर केले असेल किंवा तो नपुंसक असेल तर त्या स्त्रीला अशा लग्नातून घटस्फोट मागण्याचा अधिकार होता. या मुख्य कलमांबरोबरच पत्नीच्या व तिच्या मुलाच्या उदरनिर्वाह आणि संगोपनाची व्यवस्था करण्याबद्दलचे नियमही या कायद्यात करण्यात आले होते.

 १९३२ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात 'माता कल्याण कायदा' अमलात आणला. १९२९ च्या 'बॉम्बे माता कल्याण कायद्या' च्या धर्तीवर हा कायदा करण्यात आला होता. कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या प्रसूतीच्या काही काळ आधी व काही काळ नंतर कारखान्यातील त्यांच्या रोजगाराच्या नियमनाची

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / २३