पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यासंदर्भात रमेश जाधव महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात, “मुलांच्या सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणावर शाहू छत्रपतींनी जितके लक्ष केंद्रित केले होते तितके लक्ष त्यांनी मुलींच्या शिक्षणावर केंद्रित केल्याचे दिसत नाही. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्यातून मुलींना वगळण्यात आले होते." रमेश जाधवांचे हे निरीक्षण शाहू महाराजांचे आदर्श असणारे सयाजीराव यांच्या कामाशी तुलना करून विचारात घेतले असता शाहू महाराजांनी सयाजीरावांना आदर्श म्हणून का स्वीकारले होते याचे उत्तर मिळते.

 १८७५ मध्ये सयाजीरावांच्या राज्यारोहणावेळी बडोद्यात केवळ दोन कन्या शाळा कार्यरत होत्या. तर १९२६-२७ साली कन्या शाळांची संख्या ३७५ इतकी झाली. १८८९-९० मध्ये या शाळांमध्ये ३,४१५ विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. तर १९३३ अखेर या शाळांमध्ये सुमारे ९०,००० विद्यार्थिनी शिकत होत्या. मुलींच्या प्रमुख शाळांमध्ये मूळ विषयांच्या बरोबरीने भरतकाम, चित्रकला, संगीत, पाकशास्त्र, संस्कृत इ. विषयांचे शिक्षण देण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. १९२५-२६ मध्ये मुलींच्या दहा शाळेत शारीरिक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग करणाऱ्याकडून जमा झालेल्या दंडातून प्रतिमहिना १५० रु. रक्कम मंजूर करण्यात आली.

महाराजा सयाजीराव: स्त्रीविषयक कार्य / ९