पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८ )

श्वशुरगृहाशिवाय दुसरा कोणताही आधार नव्हता.सदा- कुवर ही मोठी मानी व कारस्थानी स्त्री होती. तिनें आपला जांवई अज्ञान आहे असें पाहून व त्याची आईही कांहीं निराळ्या स्वभावाची आहे असे लक्षांत आणून त्या दरबारांत दुफळी झाली नाहीं तोंच त्यांत आपला प्रवेश व्हावा या हेतूनें होईल तितक्या त्वरेनें गुजराणवाला येथील कारभार आपल्या हातीं घेण्यास तिनें बिलकुल बिलंब लाविला नाहीं. ती गुजराणवाला येथे आल्यावर तिनें प्रथमदर्शनींच दरबारी लोकांस निमंत्रण करून त्यांस सदुपदेशाच्या चार गोष्टी सांगितल्या व त्यांच्या स्वभावाचे चांगल्या रीतीनें परीक्षणही केलें. नंतर दिवसेंदिवस दरबारी लोकांवर व लहानसान लष्करी अमलदारांवर आपली करडी नजर ठेवून त्यांजवर तिनें आपला पुरा अंमल बसविला ; त्या योगानें तिचें प्राबल्य उत्तरोत्तर अधिकाधिक वाहू लागले; परंतु रणजितसिंग जसजसा प्रौढावस्थेत येऊ लागला तसतसा तो दरबारांत स्वतः मन घालून व तत्संबंधाने माहिती करून घेऊन आपल्या लष्क- राचा चांगला बंदोबस्त करण्याकडे लक्ष देऊं लागला. तेव्हां त्याचे कृत्य आपल्यास विघातक होईल असे त्याच्या सासूस वाटल्यावरून तिनें रणजितसिंगाचे जे कोणी अंतस्थ हितचिंतक होते त्यांचा बारीक रीतीनें शोध करून व त्यांस दहशत घालून बंदोबस्त केला; त्यामुळे रणजितसिंगास दर- वारच्या कामी लक्ष देण्यास बराच व्यत्यय येऊं लागला.
इ० स० १७९३ पासून ३० स० १७९६ पर्यंत रण- जितसिंगानें आपण होऊन स्वतंत्रपणे कोणतेच कृत्य केलें नाहीं, तथापि इ. स. १७९७ पासून त्याची अंगची कर्तबगारी जागृत होऊं लागली. त्याच्या मनांत आपल्या दरबारांत